ग्रंथालयाच्या अडचणी सोडविणार : चंद्रकांत पाटील   

पुणे : जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्न करीत असून या निधीच्या माध्यमातून ग्रंथालये अद्ययावत करण्यात येणार आहेत, तसेच राज्यातील शासकीय व सार्वजनिक ग्रंथालयाच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
 
उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय शासकीय विभागीय ग्रंथालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत घाडगे महाराज अकुल धर्मशाळा (सोमवार पेठ) येथे आयोजित राजाराम मोहनरॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या अर्थसहाय्याच्या विविध योजनांविषयी माहिती देण्यासाठी दोन दिवसीय विभागस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी पाटील बोलत होते. यावेळी उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, राजाराम मोहनरॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ‘कोलकाता’चे महासंचालक प्रा. अजय प्रतापसिंह, प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार, प्रमुख कार्यवाह सोपानराव पवार, कार्याध्यक्ष गुलाबराव पाटील आदि उपस्थित होते.
 
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील म्हणाले, समाज माध्यमांच्या युगात वाचन संस्कृती वृद्धींगत होण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवत असून शासकीय व खाजगी ग्रंथालयाचे डिजिटलायझेशन करुन वाचकांना ऑनलाइन पुस्तके उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत, यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
 
ग्रंथालयाचे अनुदान वाढविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. राज्यात ११ हजार १५० ग्रंथालये कार्यरत असून ग्रंथालयाच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी संगणकीय प्रणालीद्वारे ग्रंथाचे अद्ययावतीकरण कसे करता येईल, यासाठी प्रयत्न करावेत. सांताक्रूझ कलिना कॅम्पस येथे राज्याचे शिखर ग्रंथालय राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाची अतिशय देखणी इमारत तयार होत असून या ठिकाणी सुद्धा वाचकांसाठी पुस्तके ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. खासदार-आमदार निधीतून काही पुस्तके खरेदी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
प्रास्ताविक भाषणांत गाडेकर म्हणाले, ग्रंथालय आधुनिक झाली पाहिजेत, यासाठी विभाग प्रयत्न करीत आहे. शासकीय ग्रंथालयाप्रमाणे शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयात सुद्धा आज्ञावलीत ग्रंथाची नोंद घेण्याचे काम करत आहोत.
 

Related Articles